Maharashtra Weather Update : भारतात जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा काळ मान्सूनचा असतो. आता या चार महिन्यांपैकी तीन महिन्यांचा काळ उलटला आहे. मान्सूनच्या शेवटच्या महिन्याला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन महिन्यांच्या काळात मात्र राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जुलै महिना वगळता राज्यात अपेक्षित असा पाऊस पडलेला नाही. विशेष म्हणजे जुलै महिन्यात देखील राज्यातील काही भागात पावसाने ओढ दिल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात जवळपास गेल्या 40 दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याचे बोलले जात आहे.
यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा राहिलेल्या महाराष्ट्राला आता सप्टेंबर महिन्यातील पावसाकडून मोठी आशा आहे. जर सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडला तरच महाराष्ट्र दुष्काळापासून वाचू शकतो अन्यथा राज्यावर दुष्काळाचे संकट कायम राहणार आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यातील पावसा संदर्भात महत्त्वाची आणि अतिशय कामाची माहिती दिली आहे. खरंतर सध्याच्या घडीला कोकण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या रिमझिम सऱ्या बरसत आहेत. मात्र हा पाऊस जून आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून काढणार नाही असे मत तज्ञ लोकांनी व्यक्त केले आहे.
अशातच आता पुणे वेधशाळेने महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरी एवढा पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. याचाच अर्थ सप्टेंबर महिन्यात समाधानकारक पाऊस होणार आहे. चार ते पाच सप्टेंबर पासून पावसाला सुरुवात होईल आणि 19 ते 20 तारखेपर्यंत पावसाचा जोर टिकून राहील असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
वेधशाळेने सप्टेंबर महिन्यात सरासरी एवढा म्हणजेच 91 ते 109 मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता यावेळी व्यक्त केली आहे. तसेच काही हवामान तज्ञांनी राज्यात दोन सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी या चार जिल्ह्यात आणि तीन सप्टेंबर रोजी नांदेड लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
या कालावधीत या संबंधित जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र जर गेल्या तीन महिन्यांप्रमाणे सप्टेंबर महिन्यात देखील पावसाने हुलकावणी दिली तर महाराष्ट्रात पाणीसंकट अजूनच तीव्र होण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर महिन्यात हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पाऊस पडला नाही तर महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत जाणार आहे. त्यामुळे आता सप्टेंबर महिन्यातील हा हवामान अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.