Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीची हजेरी लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक वाया गेले आहे. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे.
रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांची काढणी सुरू असतानाच अवकाळी पावसाने आणि गारपिटीने तडाका दिला आहे. याचा परिणाम म्हणून अंतिम टप्प्यातील पिकांना मोठा फटका बसला आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.
विशेष म्हणजे आगामी तीन दिवस राज्यात अशीच परिस्थिती कायम राहणार असा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 19 आणि 20 मार्चला देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण 19 आणि 20 मार्चला राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल याबाबत हवामान खात्याने काय माहिती दिली आहे हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आज कुठे बसरणार अवकाळी पाऊस अन कुठे होणार गारपीट
आय एम डी ने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार आज 18 मार्च 2024 ला राज्यातील मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होणार अशी शक्यता आहे. दुसरीकडे, विदर्भात देखील आज अवकाळी पावसाची शक्यता आहे विशेष म्हणजे आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होईल असा अंदाज आहे.
विदर्भ विभागातील अकोला, भंडारा, गडचिरोली, गोंदीया, वर्धा, वाशीम या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे.
19 अन 20 मार्चला कसं राहणार हवामान
19 मार्च 2024 : आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार 19 तारखेला राज्यातील लातूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, गडचिरोली, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस हजेरी लावू शकतो.
मात्र, नागपूर, गोंदीया, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस अन काही ठिकाणी गारपीट होईल असा अंदाज आहे. शिवाय, मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस हजेरी लावणार अशी शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
20 मार्च 2024 : वीस तारखेला देखील राज्यातील हिंगोली आणि नांदेड या मराठवाड्यातील दोन जिल्ह्यात हलका पाऊस होणार असा अंदाज आहे. तसेच विदर्भ विभागातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदीया, नागपूर जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. 20 तारखेला मात्र कुठेच गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.