Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल पाहायला मिळत असून पूर्व मौसमी पाऊस हजेरी लावत आहे. पूर्व मौसमी पावसामुळे राज्यात उन्हाचे चटके काहीसे कमी झाले आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळत असून यामुळे उकाड्याने हैरान झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र असे असले तरी या वादळी पावसाचा शेती क्षेत्रावर मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अवकाळी पाऊस केव्हा विश्रांती घेणार ? हा मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. अशातच, आता भारतीय हवामान खात्याने आज पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने आज राज्यातील 21 जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.
काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काही ठिकाणी गारपीट होणार असा अंदाज आहे. दरम्यान, आता आपण भारतीय हवामान विभागाने कोणत्या 21 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसणार वादळी पाऊस
आम्ही आपणास सांगू इच्छितो की काल अर्थातच 14 मे 2024 ला राजधानी मुंबई, नगर, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे काल काही ठिकाणी गारपीट झाल्याचीही नोंद करण्यात आली आहे.
आज देखील अशीच परिस्थिती कायम राहणार असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट तर काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने आज उत्तर कोकणातील ठाणे आणि मुंबई तथा दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसह वादळी पावसाचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय आज नाशिक, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासह गारपीट होणार असा अंदाज देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर आयएमडीने या तिन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.
तसेच आज मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाडा विभागातील जालना, बीड, धाराशिव आणि विदर्भ विभागातील वाशीम, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे. एकंदरीत राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्णतेसह वादळी पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी गारपीटीसह वादळी पाऊस बरसणार असा अंदाज आहे.