Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता मान्सूनने महाराष्ट्रातून एक्झिट घेतल्यानंतर ऑक्टोबर हिटमुळे परेशान झाली आहे. वाढलेल्या तापमानामुळे नागरिक बेजार झाले आहेत. राज्यातील बहुतांशी भागात चालू ऑक्टोबर महिन्यात खूपच अधिक तापमान पाहायला मिळत आहे. याचा परिणाम म्हणून नागरिकांच्या माध्यमातून आता थंडीला केव्हा सुरूवात होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवाय यंदा मान्सूनचा परतीचा पाऊस देखील महाराष्ट्रात मनसोक्त बरसलेला नसल्याने शेतकरी बांधवांकडून यंदा अवकाळी पाऊस होणार का याबाबत विचारणा केली जात आहे. खरंतर यावर्षी जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात खूपच कमी पाऊस झाला आहे. राज्यात फक्त जुलै आणि सप्टेंबर या दोन महिन्यात चांगला पाऊस झाला आहे.
मान्सूनच्या चार महिन्यांपैकी फक्त दोन महिनेच चांगला पाऊस झाला असल्याने राज्यातील काही भाग दुष्काळाचे उंबरठ्यावर उभे आहेत. राज्यातील जवळपास 40 तालुके हे दुष्काळग्रस्त आहेत. विशेष म्हणजे शासनाने हे 40 तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे जाहीर केले आहे, प्रत्यक्षात राज्यात असे अनेक तालुके आहेत ज्या ठिकाणी खूपच कमी पाऊस झाला आहे.
अशा परिस्थितीत या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता अवकाळी पाऊस का होईना पण पाऊस बरसला पाहिजे जेणेकरून गुराढोरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न तरी सुटेल असे मत व्यक्त केले जात आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने थंडीबाबत आणि पावसाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील कमाल आणि किमान तापमानात घट येणार आहे. ज्यावेळी कमाल आणि किमान तापमान कमी होते त्यावेळी थंडीची तीव्रता वाढते. यामुळे आता ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून म्हणजे या चालू आठवड्यातच थंडीला सुरुवात होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
परंतु थंडीचा खरा जोर हा 15 नोव्हेंबरपासून वाढणार असे देखील हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. अर्थातच यंदा दिवाळीनंतरच थंडीचा जोर वाढणार हे स्पष्ट होत आहे. खरंतर या वर्षी एलनिनोमुळे थंडी कमी राहील असे सांगितले जात होते मात्र काही हवामान तज्ञांनी याला खोडा घातला आहे. हवामान तज्ञांच्या मते यंदा चांगल्यापैकी थंडी पडणार आहे. थंडीवर कोणत्याच हवामान प्रणालीचा विपरीत परिणाम होणार नाही.
तसेच हवामान तज्ज्ञांनी यंदा नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात अवकाळी पाऊस पडणार नसल्याचे जाहीर केले आहे. वास्तविक दरवर्षी हिवाळ्याच्या काळात अवकाळी पावसाची हजेरी लागतेच यामुळे यंदाही अवकाळी पाऊस पडणार का हा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत होता. पण हवामान खात्यातील काही तज्ञांनी यंदा नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात अवकाळी पाऊस बरसणार नसल्याचे सांगितले आहे.