Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर असलेला मान्सून पुन्हा एकदा राज्यात सक्रिय झाला आहे. राज्यात सध्या पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात गेल्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे.
राज्यातील कोकण आणि विदर्भ विभागातील काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे तर उर्वरित राज्यात मात्र पावसाचा जोर काहीसा ओसरला असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे राज्यातील बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत आला आहे. खरंतर सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाची शक्यता होती. विशेष म्हणजे या चालू महिन्यात काही भागांमध्ये आत्तापर्यंत चांगला पाऊस देखील झाला आहे.
मात्र तरीही राज्यातील बहुतांशी भागात अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहिली जात आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट दिले आहे. हवामान विभागाने गणेशोत्सवाच्या शुभारंभी राज्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आज राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यात आज जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे. यातील रायगड ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे उद्यापासून विदर्भात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मात्र पुढील आठवडाभर राज्यातील इतर भागातून पावसाचा जोर ओसरणार असा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे सक्रिय झाल्यामुळे सध्या राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याची माहिती हवामान विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी राज्यात जोरदार पाऊस होणार असा अंदाज असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.