Maharashtra Weather Update : जुलै महिन्यात महाराष्ट्राला पावसाने अक्षरशा झोडपून काढले होते. यावर्षी मान्सूनने महाराष्ट्राच्या मुख्य भूमीत उशिराने प्रवेश केला. विशेष म्हणजे मान्सून दाखल झाल्यानंतरही राज्यात अपेक्षित असा पाऊस पडला नाही. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढला आणि राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला.
विशेष म्हणजे गेल्या महिन्यात कोकणातील आणि विदर्भातील बहुतांशी भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आणि शेती पिकांवर याचा विपरीत परिणाम पाहायला मिळाला. मात्र या चालू ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर खूपच कमी झाला आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यातील सुरुवातीचे चार दिवस हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळाला मात्र तदनंतर पाऊस पूर्णपणे गायब झाला आहे. त्यामुळे पाऊस गेला कुण्या गावा ? अशी विचारणा शेतकऱ्यांच्या माध्यमातून होत आहे.
दरम्यान आगामी आठवडा राज्यात कसं हवामान राहणार? याबाबत देखील शेतकऱ्यांना जाणून घ्यायचे आहे. अशा परिस्थितीत आज आपण भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस महाराष्ट्रात कस हवामान राहणार याबाबत काय अपडेट दिली आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे, विदर्भातील उर्वरित भागात मात्र प्रामुख्याने उघडीप राहणार असा अंदाज आहे. IMD म्हणतंय की, उर्वरित राज्यात ऊन सावल्यांच्या खेळ सुरूच राहील. तसेच पुढील पाच दिवस राज्यात मुख्यत; ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरीचा शिडकाव होण्याचा अंदाज आहे.
पुढील पाच दिवस राज्यात प्रामुख्याने पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे गेल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकंदरीत आगामी पाच दिवस राज्यात पावसाची उघडीप राहणार अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. निश्चितच या हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडणार आहे.