Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात मोठी वाढ होत आहे. कमाल तापमानात वाढ होत असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशातच मात्र अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबक्षेत्रामुळे देशातील काही भागात पावसाची हजेरी लागली आहे. आपल्या राज्यात देखील गेल्या दोन दिवसांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे तर काही ठिकाणी पावसाच्या रिमझिम सऱ्या बरसल्या आहेत.
विशेष म्हणजे काल नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील झाला आहे. यामुळे संबंधित भागातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा हाहाकार आहे. वाढत्या कमाल तापमानामुळे नागरिक घामाघूम होत आहेत. यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून देशात हिवाळ्याला केव्हा सुरुवात होणार हा सवाल उपस्थित केला जात आहे.
तसेच यावर्षीचा हिवाळा कसा राहणार, यंदा हिवाळ्यात पाऊस पडणार का ? कडाक्याची थंडी केव्हा पडणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान यंदाच्या हिवाळ्याबाबत भारतीय हवामान विभागाने आणि जागतिक दर्जाच्या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने महत्त्वाची माहिती दिली आहे. जागतिक स्तरावरील काही हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या अल निनोच्या स्थितीची तीव्रता दिवसागणिक वाढत असल्याचे नमूद केले आहे.
तसेच याचा परिणाम म्हणून यंदाच्या हिवाळ्यातही नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. तसेच उन्हाळ्यातही प्रमाणाहून जास्त तापमान राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे पुढल्या वर्षीच्या पावसाळ्याच्या ऋतूवरही अल निनोचा परिणाम दिसून येऊ शकतो असे सांगितले जात आहे. एकूणच काय की यावर्षी हिवाळ्यात देखील कमाल तापमान वाढलेले राहण्याची शक्यता आहे.
यामुळे हिवाळ्यातही नागरिकांना उन्हाचे चटके सोसावे लागू शकतात. सध्या राज्यातील काही भागात थंडीची इंट्री झाली आहे. मात्र कडाक्याची थंडी अजूनही राज्यात पडत नाहीये. सध्या दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे पुढे देखील अशीच परिस्थिती राहू शकते हे मात्र नाकारता येत नाही. यामुळे यंदाच्या हिवाळ्यात कडाक्याची थंडी केव्हा पडणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने पुढील दोन दिवस उत्तर पश्चिम भारतात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हिमाचलमधील काही भागात रिपरिप पाऊस होईल तर काही भागात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लडाख, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या भागात थंडीचा कडाका वाढताना दिसेल, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
एकंदरीतच देशातील उत्तरेकडच्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत आहे. यामुळे संबंधित भागातील जनतेला गुलाबी थंडीमुळे उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. पण महाराष्ट्र आणि केरळासह दक्षिणेकडील राज्यांमध्ये उन्हाच्या झळा आणखी तीव्र होतील असे देखील हवामान विभागाने यावेळी स्पष्ट केले आहे. यामुळे आता यंदाच्या हिवाळ्यात जोरदार थंडी पडणार का? हे पाहणे विशेष उत्सुकत्याचे राहणार आहे.