Maharashtra Weather Update : महाराष्ट्राकडे गेल्या दिड महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. मध्यंतरी राज्यातील काही भागात हलका पाऊस झाला मात्र मुसळधार पाऊस जणू काही गायबच झाला होता. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. दरम्यान आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढायला सुरुवात झाली आहे.
काल राज्यातील नागपूर मध्ये खूपच मुसळधार पाऊस झाला आहे. नागपूर मध्ये अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस झाला असल्याने नागपूर मधील बहुतांशी भागात पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. नागपूर व्यतिरिक्त विदर्भातील बहुतांशी भागात काल आणि परवा पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही आता पुन्हा एकदा गेल्या दीड महिन्यांपासून रेंगाळलेला मान्सून सक्रिय झाल्याचे चित्र आहे.
21 सप्टेंबर पासून राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद केली जात आहे. कोकण, घाटमाथा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील तसेच मराठवाड्यातील बहुतांशी भागात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. विशेष म्हणजे हवामान खात्याने 25 सप्टेंबर पर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहील अशी शक्यता देखील यावेळी वर्तवली आहे.
हवामान खात्याने राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त केला असून या संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याच्या माध्यमातून येलो अलर्ट बहाल करण्यात आला आहे.
राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, नगर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या 22 जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाने जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर या 22 जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे.