Maharashtra Weather Update : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गणेश उत्सवाचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होत आहे. खरंतर दरवर्षी गणेशोत्सवाच्या सणाला राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यंदाही गणेशोत्सवाच्या काळात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु 19 सप्टेंबर रोजी अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवशी राज्यात म्हणावा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव कोरडाच जाणार की काय अशी भीती व्यक्त केली जात होती.
खरंतर राज्यात गेल्या ऑगस्ट महिन्यात फारसा पाऊस झाला नाही. असं म्हणण्यापेक्षा संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडाच गेला. यामुळे खरीप हंगामातील पिकांनी अक्षरशः माना टेकल्यात. खरिपातील पिके पावसाअभावी फारशी वाढली नाहीत. शिवाय काही भागातील पिके पाऊसच नसल्याने करपून गेलीत. यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची जरुरत आहे. अशातच गणेश चतुर्थीच्या दिवशी राज्यात मोठा पाऊस झाला नाही.
काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली मात्र शेतकऱ्यांना आता मोठ्या पावसाची गरज असल्याने या पावसामुळे शेतकरी असंतुष्टच आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील कोकण, ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. तसेच रत्नागिरी, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, जालना, नांदेड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही तुरळक पाऊस झाला आहे.
परंतु राज्यात कुठेच मुसळधार पाऊस झालेला नाही. अशातच हवामान खात्याने येत्या 24 तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने आगामी तीन ते चार दिवस राज्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.
तसेच येत्या 24 तासांसाठी राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज 21 सप्टेंबर रोजी राज्यातील कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विदर्भ विभागातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामानाचा हा अंदाज लक्षात घेऊन या संबंधित भागातील नागरिकांनी घराबाहेर पडावं अशा सूचना सुद्धा यावेळी देण्यात आल्या आहेत.