Maharashtra Weather Update : यंदा महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन जवळपास दहा ते पंधरा दिवस उशिराने झाले. शिवाय मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सुरुवातीचा काही काळ अपेक्षित असा पाऊस झाला नाही. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. राज्यात जून महिन्यात म्हणजेच पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. अनेक भागात तर पाऊसच पडला नाही.
यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी दुष्काळ पडतो की काय अशी भीती वाटत होती. मात्र तसे काही झाले नाही जुलै महिन्यात पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली. जुलैमध्ये राज्यातील मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला.
जास्तीच्या पावसामुळे अनेक भागात शेतात पाणी साचले. नद्यांना पूर आलेत. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पावसाच्या जोरधारामुळे राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आणि जनजीवन विस्कळीत झाले. मात्र आता गेल्या सात ते आठ दिवसांपासून राज्यातून पावसाचा जोर ओसरला आहे.
यामुळे पूरस्थिती निवळली असून आता सामान्य जनजीवन पूर्वपदावर आले आहे. खरंतर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच राज्यातील अनेक भागातुन पावसाने काढता पाय घेतला. तसेच ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीचे दोन दिवस राज्यातील बहुतांशी भागात पाऊसाने उघडीप दिली. मात्र कालपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे.
मात्र हा पाऊस जुलै महिन्याप्रमाणे नदी नाले दुथडी भरून निघेल असा नाहीये. दरम्यान भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमीच पाऊस राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 98% एवढाच पाऊस पडणार असा अंदाज आयएमडीने नुकताच व्यक्त केला आहे. मात्र असे असले तरी राज्यासाठी पुढील 24 तास अतिशय महत्त्वाचे आहेत.
येत्या 24 तासात राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत मुंबई वेधशाळेने महत्वाची माहिती दिली आहे. मुंबई वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, आज पुणे, सातारा, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या चार जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासोबतच राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट जारी झाला आहे.
मुंबई हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर यासंबंधीत जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.