Maharashtra Weather Update : महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांच्या हवामानात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने बदल होत आहे. हवामानात होत असलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
दरम्यान गेल्या महिन्याप्रमाणेच फेब्रुवारी महिन्यातही अवकाळी पावसाने दणका दिला आहे. 10 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे मध्यंतरी काही भागात गारपीट देखील झाली होती.
अशातच आता भारतीय हवामान विभागाने आज अर्थातच 18 फेब्रुवारी 2024 ला पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वेस्टर्न वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील काही भागात आज आणि उद्या पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
यामध्ये आपल्या महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. दरम्यान, आता आपण भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला नवीन सुधारित हवामान अंदाज थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय म्हणतय हवामान विभाग ?
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज पासून पुढील दोन दिवस अर्थातच 20 फेब्रुवारीपर्यंत पंजाबमध्ये आणि उद्यापासून पुढील दोन दिवस अर्थातच 21 फेब्रुवारी पर्यंत दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि अन्य राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्याचबरोबर जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये २२ फेब्रुवारीपर्यंत मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याशिवाय सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभाग म्हणतंय की दक्षिण गुजरात, कोकण, गोवा ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील हवामान अंशतः ढगाळ होत आहे. यामुळेच आज राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता तयार होत आहे.
राज्यात कोकण वगळता अनेक भागात तुरळक पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता imd ने वर्तवली आहे.