Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात गेल्या 12-13 दिवसांपासून पूर्व मोसमी पाऊस सुरू आहे. राज्यात काही ठिकाणी वादळी पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेची लाट येत आहे. म्हणजे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून संमिश्र हवामान पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागांवर सूर्यदेव कोपला असून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
यामुळे उष्णतेने अंगाची अक्षरशा लाहीलाही होत आहे. उन्हाचा चटका वाढला असल्याने आता मान्सूनचे आगमन कधी होणार हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. मान्सूनची अगदी चातका प्रमाणे वाट पाहिली जात आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने 19 मेला मान्सूनचे अंदमानात आगमन झाले असून येत्या 31 मे ला मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचे म्हटले आहे.
यामुळे आपल्या महाराष्ट्रात देखील यंदा मान्सूनचे जूनच्या पहिल्या आठवड्यात आगमन होऊ शकते असे म्हटले जात आहे. तथापि या संदर्भात मे अखेरीस हवामान खात्यातील तज्ज्ञांचा अंदाज समोर येणार आहे.
दरम्यान गेल्या बारा ते तेरा दिवसांपासून सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस अजून पुढील काही तास सुरूच राहणार अशी शक्यता आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार आज देखील राज्यातील दहा ते अकरा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
मात्र काही जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेची लाट येणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ विभागातील अकरा जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे.
IMD ने आज कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, मराठवाडा विभागातील लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, विदर्भ विभागातील बुलढाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या संबंधित जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे खानदेशातील तिन्ही जिल्ह्यात, नाशिक, पुणे आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेची लाट येणार असा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट या जिल्ह्यांना जारी करण्यात आला आहे. यामुळे संबंधित जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.