Maharashtra Weather Update : भारतीय हवामान खात्याने 25 सप्टेंबर पासून नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे जाहीर केले होते. यानुसार देशातील राजस्थान, गुजरातसह विविध राज्यांमधून मान्सून माघारी फिरला आहे.
आपल्या राज्यातूनही आत्तापर्यंत जवळपास निम्म्या महाराष्ट्रातून मान्सून रिटर्न झाला आहे. विशेष म्हणजे आगामी काही तासांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार असा अंदाज आहे. यावर्षी, देशाच्या मुख्य भूमीत अर्थातच केरळमध्ये मान्सूनचे उशिराने आगमन झाले.
केरळमध्ये उशिराने दाखल झालेला मान्सून राज्यातील तळ कोकणात देखील उशिराने आला. याचा परिणाम म्हणून जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. यानंतर जुलै महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाला.
जुलैमध्ये मराठवाडा विदर्भ कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र अर्थातच संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी लागली. यामुळे जून महिन्यातील पावसाची तूट बऱ्यापैकी भरून निघाली होती. पण ऑगस्ट महिन्यात 21 दिवसांपेक्षा जास्तीचा काळ पावसाचा खंड पाहायला मिळाला.
यामुळे महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन थांबला होता. अशातच पुन्हा सप्टेंबर महिन्यात पावसाचे जोरदार कमबॅक झाले. गेल्या महिन्यात चांगला जोरदार पाऊस झाला. मात्र या पावसाने ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून निघालेली नाही.
अशातच आता मान्सून माघारी फिरत आहे. आपल्या राज्यातील मुंबई, पुण्यासह मराठवाडा, विदर्भातून मानसून माघारी फिरला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने देशातील काही भागांमध्ये परतीचा पाऊस चांगला जोरदार बरसणार असा अंदाज नुकताच वर्तवला आहे.
कोणत्या भागात बरसणार मुसळधार पाऊस?
राज्यातील मुंबईसह मराठवाडा व विदर्भातून मान्सून परतला आहे. पण आज महाराष्ट्रातील काही भागात परतीचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार येत्या 24 तासात देशातील हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू-काश्मीर भागात परतीचा पाऊस जोरदार बरसण्याची शक्यता आहे. तसेच सिक्कीम, पश्चिम बंगालसह, कर्नाटक, तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
एवढेच नाही तर देशातील काही भागांमध्ये 12 ऑक्टोबर पर्यंत पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम,अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरीमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच या भागात 12 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देखील आय एम डी ने दिला आहे. तसेच 12 ऑक्टोबरनंतर मात्र देशातील बहुतांशी भागांमध्ये हवामान कोरडे होणार. दक्षिण भारत, ईशान्य भारत आणि बेटांवर 14 ऑक्टोबर पर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पण त्यानंतर मात्र संपूर्ण भारत वर्षात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे येत्या दोन दिवसात महाराष्ट्रासहित इतर देशातील विविध भागांमधून मान्सून माघारी फिरणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे.