Maharashtra Weather Report : फेब्रुवारीचा पहिला पंधरवडा उलटला आहे. दुसऱ्या पंधरवड्यातीलही तीन-चार दिवस उलटले आहेत. खरंतर दरवर्षी फेब्रुवारी अखेरपर्यंत थंडीचा जोर कायम राहतो. यंदा मात्र राज्यातील तसेच देशातील अनेक भागांमधून थंडीने काढता पाय घेतलेला आहे.
अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. एकंदरीत वेळेआधीच उन्हाळ्याला सुरुवात झाली असल्याचे चित्र सध्या राज्यासह देशातील काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे. अशातच, आता हवामान विभागाने देशातील सात राज्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार असा अंदाज दिला आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, आगामी तीन ते चार दिवस देशातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. यामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत आता आपण हवामान विभागाने नेमक्या कोणत्या राज्यात अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता वर्तवली आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज काय म्हणतो
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज अर्थातच 19 फेब्रुवारी 2024 ला देशातील जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होईल असा अंदाज आहे.
दुसरीकडे आजपासून आगामी तीन दिवस राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि पंजाब, हरियाणामध्ये सुद्धा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे सदर राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होणार आहे.
आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे उत्तर प्रदेश मधील पूर्व आणि पश्चिम भागात आजपासून 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मध्य प्रदेश मध्ये देखील पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे काही ठिकाणी गारपीट देखील होईल असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मध्यप्रदेश मधील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी या ठिकाणी घ्यायची आहे. अन्यथा रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते.
महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार
महाराष्ट्रातही अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा बसणार असे आयएमडीने म्हटले आहे. सध्या राज्यातील अनेक भागातून थंडीने काढता पाय घेतला आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे. यामुळे राज्यात आगामी काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
तसेच काही ठिकाणी गारपीट देखील होणार असे आय एम डी ने स्पष्ट केले आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल असे आयएमडीने म्हटले आहे. यामुळे सदर विभागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष सतर्क राहणे अपेक्षित आहे.