Maharashtra Weather : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. कधी ढगाळ हवामान, कधी अवकाळी पाऊस तर कधी गुलाबी थंडी जाणवत आहे.
यामुळे स्वेटर घालावे, रेनकोट घालावे की छत्री घेऊन घराबाहेर पडावे हा मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे. आता मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामान पूर्वपदावर आले आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानात हळूहळू आता घट होऊ लागली आहे.
यामुळे राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. विशेष बाब म्हणजे हा कमी दाबाचा पट्टा आज रोजी चक्रीवादळात परावर्तित होणार आहे.
हे चक्रीवादळ उद्या अर्थातच 18 नोव्हेंबर 2023 रोजी बांगलादेशच्या किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस सुरू होणार कां असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात कुठेच पाऊस पडणार नाही असे स्पष्ट केले आहे. तसेच खुळे यांनी आता महाराष्ट्रात हळूहळू थंडीचा जोर वाढणार असल्याचे सांगितले आहे. खुळे यांनी रविवार अर्थातच 19 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात सर्व दूर थंडी जाणवणार असे सांगितले आहे.
तसेच त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आजपासूनच थंडीला सुरुवात होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. पण महाराष्ट्रात सर्वदूर 19 तारखे नंतर थंडीला सुरुवात होणार आहे.
उत्तर भारतात पश्चिमी प्रकोपाची आणि त्यामुळे पाऊस व बर्फवृष्टीची शक्यता असून याच्या प्रभावाखाली राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
एकंदरीत महाराष्ट्रात आता 19 तारखेनंतर हळूहळू थंडीला सुरुवात होणार आहे. यामुळे गुलाबी थंडीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना आता लवकरच थंडी अनुभवायला मिळणार आहे.