Maharashtra Vande Bharat Railway : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील पहिली संपूर्ण स्वदेशी बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन 2019 मध्ये सर्व्यात आधी रुळावर आली. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर टप्प्याटप्प्याने या गाडीचे देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर संचालन सुरू झाले. आत्तापर्यंत देशातील 52 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले आहे.
विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रालाही आठ वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत. राज्यातील मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, नागपूर ते बिलासपुर आणि नागपूर ते इंदोर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात आतापर्यंत जेवढ्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत त्या सर्व आठ किंवा 16 कोच असणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस आहेत. मात्र आता देशाला लवकरच 20 कोच असणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार आहे. विशेष म्हणजे या देशातील पहिल्या 20 कोचं असणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे ट्रायल रन देखील आता सुरु झाले आहे.
अहमदाबाद ते मुंबई दरम्यान ही गाडी सुरु होणार आहे. या मार्गावर या ट्रेनची ट्रायल रन सुद्धा सुरू झाली आहे. 20 डब्यांची ही पहिली वंदे भारत ट्रेन असून ही ट्रेन ताशी 130 किलोमीटर वेगाने चालवली जात आहे. ट्रायलसाठी ही ट्रेन आज सकाळी 7 वाजता अहमदाबादहून निघाली. अहमदाबादहून वडोदरा-सुरतमार्गे दुपारी १२.१५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहचली.
सध्या अहमदाबाद ते मुंबई दरम्यान प्रत्येकी 16 डब्यांच्या दोन वंदे भारत ट्रेन धावत आहेत. पण आता या मार्गावर 20 डब्ब्यांची वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. अहमदाबाद येथून 20 डब्यांच्या वंदे भारत ट्रेनच्या ट्रायल रन दरम्यान, आधीपासून धावणाऱ्या 14C + 2E डब्यांमध्ये आणखी 4C कोच जोडण्यात आले होते.
जस की आपणास ठाऊकच आहे की, या मार्गावर सध्या सुरू असणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय. यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. परिणामी, गदगद झालेल्या रेल्वेने चाचणी यशस्वी झाल्यानंतर देशातील पहिली 20 डब्यांची वंदे भारत ट्रेन या मार्गावर चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
या चाचणीत सध्याची 16 डब्यांची वंदे भारत ट्रेन 20 डब्यांसह 130 किलोमीटर प्रतितास वेगाने चालवून डब्यांची संख्या वाढवल्याने वेगात काही फरक पडतो का आणि अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल या ट्रेनला किती वेळ लागतो या गोष्टी तपासल्या गेल्या आहेत. खरंतर पाच वर्षांपूर्वी या मार्गावर 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने ट्रेन चालवण्यासाठी मिशन रफ्तार हाती घेण्यात आले.
या मिशन रफ्तार अंतर्गत आता सुरुवातीच्या टप्प्यात 130 किलोमीटर प्रतितास या वेगाने ट्रेन चालवली जाणार आहे आणि यानंतर मग 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने ही ट्रेन चालवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत देशातील पहिली 20 कोच असणारी वंदे भारत एक्सप्रेस आता मुंबई ते अहमदाबाद दरम्यान सुरू होणार आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.