Maharashtra Vande Bharat Express : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात सध्या वंदे भारत एक्सप्रेसची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. ही हायस्पीड ट्रेन अल्पावधीतच रेल्वे प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे.
ही एक्सप्रेस सुरू होऊन आता जवळपास पाच ते सहा वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे. या कालावधीत ही गाडी देशातील विविध महत्त्वाच्या मार्गांवर सुरू करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट झाला आहे.
ही गाडी जवळपास 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम आहे. सध्या स्थितीला ही हायस्पीड ट्रेन देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर चालवली जात आहे.
यापैकी सात गाड्या आपल्या महाराष्ट्रातून धावत आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात देशातील इतरही अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होणार आहे.
भविष्यात आपल्या महाराष्ट्राला देखील आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार येत्या काळात महाराष्ट्राला चार नवीन वंदे भारतची भेट दिली जाणार आहे.
यामुळे राज्यातील या प्रकारच्या एक्सप्रेसचे जाळे आणखी मजबूत होणार असून प्रवाशांचा प्रवास आणखी जलद आणि सुरक्षित होणार आहे.
सध्या महाराष्ट्रात किती वंदे भारत सुरू आहेत
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या स्थितीला राज्यातून या प्रकारच्या सात हायस्पीड ट्रेन धावत आहेत. यामध्ये मुंबई ते सोलापूर, मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते गोवा, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या गाड्यांचा समावेश होतो. या हाय स्पीड ट्रेनमुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास खूपच जलद झाला आहे.
कोणत्या मार्गावर सुरू होणार नवीन वंदे भारत ?
मीडिया रिपोर्टनुसार, आगामी काळात मध्य रेल्वेमार्गावर चार नवीन हायस्पीड ट्रेन सुरू होणार आहेत. यामध्ये राजधानी मुंबई ते मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या 331 किलोमीटर लांबीच्या मार्गावर ही हाय स्पीड ट्रेन चालवली जाईल अशी शक्यता आहे.
याशिवाय पुणे ते सिकंदराबाद या 562.9 किलोमीटर लांबीच्या मार्गावर ही ट्रेन सुरू होणार आहे. सध्या पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर शताब्दी एक्सप्रेस सुरू आहे मात्र या एक्सप्रेसला पूर्णविराम देऊन नवीन हाय स्पीड ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वे कडून घेतला जाणार आहे.
तसेच 554 किलोमीटर लांबीच्या मुंबई ते शेगाव या मार्गावर देखील ही गाडी चालवली जाणार आहे. विशेष म्हणजे पुणे ते शेगाव या 470 किलोमीटर लांबीचा मार्गावर देखील या गाडीचे संचालन सुरू होणार अशी आशा व्यक्त होत आहे. जर या चार मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर राज्यातील या प्रकारच्या एक्सप्रेसची संख्या अकरावर पोहचणार आहे.