Maharashtra Vande Bharat Express : महाराष्ट्र राज्याची उपराजधानी अर्थातच नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी पुणे यादरम्यानचा प्रवास लवकरच सुपरफास्ट होणार आहे. सध्या पुणे ते नागपूर दरम्यान प्रवास करण्यासाठी सध्या खूपच कमी प्रमाणात रेल्वे गाड्यां उपलब्ध आहेत. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अशा परिस्थितीत, पुणे ते नागपूर प्रवास गतिमान व्हावा यासाठी रेल्वेच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. पुणे ते नागपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार अशी माहिती समोर आली आहे. या गाडीमुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी होण्यास मदत मिळणार आहे.
अशातच या ट्रेन संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नागपूर स्थित मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूर-पुणे वंदे भारत ट्रेनचा प्रस्ताव दिला आहे. या मार्गावर धावणाऱ्या एसी बस आणि एसी गाड्यांचे भाडे, प्रवासी संख्या आणि इतर तांत्रिक माहिती संकलित केल्यानंतर दिशादर्शकतेचे विश्लेषण करून या मार्गांच्या वाहतूक सर्वेक्षणाचा अहवाल अर्थातच प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे.
ज्याला मंजुरी मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. तसेच या गाडीला बडनेरा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळू शकतो असा दावा केला जात आहे. याव्यतिरिक्त नागपूर ते भोपाळ आणि नागपूर ते हैदराबाद या मार्गावर देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
निश्चितच या तीन मार्गावर जर ही एक्सप्रेस सुरू झाली तर या मार्गावरील रेल्वे प्रवाशांचा यामुळे मोठा फायदा होणार आहे. तूर्तास रेल्वे कडून या तीन मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार की नाही याबाबत कोणतीच माहिती पुरवण्यात आलेली नाही परंतु या तिन्ही मार्गांचे सर्वेक्षण गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आले आहे. यामुळे या मार्गावर ही गाडी सुरू होण्याची दाट शक्यता आहे.