Maharashtra Untimely Rain : महाराष्ट्रात अवकाळी पावसाच थैमान थांबण्याचे नाव घेत नाहीये. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. खरेतर गेल्या पाच दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची हजेरी लागत आहे.
हा मान्सूनोत्तर पाऊस मात्र शेती पिकांसाठी मोठा घातक ठरत आहे. सुरवातीला हवामान खात्याने 28 नोव्हेंबरपर्यंतचं अवकाळी पाऊस बरसणार आणि त्यानंतर हळूहळू हवामान कोरडे होणार आणि थंडीचा जोर वाढणार असे सांगितले होते.
पण हवामानात अचानक बदल झाला आणि 28 नोव्हेंबर नंतर ही राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस बरसला. अजूनही राज्यात अवकाळी पाऊस सुरूच आहे. काल-परवा राज्यातील कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.
अशातच हवामान विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हवामानासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज देखील अवकाळी पाऊस बरसणार अशी शक्यता आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार आज उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वारे, विजा, मेधगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच आज मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान, विजांसह पावसाची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार अवकाळी पाऊस ?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज एक डिसेंबर ला राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. याशिवाय आज मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि विदर्भ विभागातील बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर आज हवामान विभागाने या संबंधीत जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. परिणामी या संबंधित विभागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची आणि पाळीव प्राण्यांचे विशेष काळजी घ्यावी असे आवाहन देखील जाणकार लोकांच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले आहे.