Maharashtra Successful Farmer : गेल्या काही वर्षांच्या काळात राज्यातील तसेच देशभरातील शेतकरी बांधव शेतीमधून अपेक्षित अशी कमाई होत नसल्याने कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत. कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण देखील वाढले आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागात सततच्या नातीकीमुळे शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण मोठे वाढले आहे. यावर्षी देखील राज्यावर भयान दुष्काळाचे सावट आहे.
यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधव सध्या चिंतेत आहेत. हाती पैसा नसल्याने संसाराचा गाडा कसा चालवायचा हाच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण करत आहे. अशा या विपरीत परिस्थितीमध्ये मात्र शेतकरी आत्महत्येसाठी आणि दुष्काळासाठी कुख्यात बनलेल्या मराठवाड्यातून एक अतिशय सकारात्मक असे चित्र समोर आले आहे. मराठवाड्यातील एका युवा शेतकऱ्याने करटुले या रानभाजीची लागवड करून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे.
खरंतर करटुले जंगलात नैसर्गिक रित्या वाढणारी एक रानभाजी आहे. ही एक औषधी वनस्पती असून याला माळकऱ्यांचे मटण म्हणून ओळखले जाते. या पिकाला बाजारात मोठी मागणी असते. हेच कारण आहे की, महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी आता या पिकाच्या व्यावसायिक शेतीकडे वळू लागले आहेत. आता या पिकाला एक महत्वाचे कॅश क्रॉप म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
विशेष म्हणजे या पिकाची लागवड राज्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याच्या मौजे तळेगाव येथील युवा शेतकरी कृष्णा फलके यांनी देखील करटूल्याची व्यावसायिक शेती सुरू केली आहे. विशेष म्हणजे या शेतीमधून त्यांना लाखो रुपयांची कमाई होत आहे. यंदा दुष्काळ असतानाही या पिकाच्या शेतीतून त्यांना लाखो रुपये मिळाले आहेत.
याबाबत कृष्णा फलके यांनी माहिती दिली आहे. कृष्णा सांगतात की, त्यांचे आजोबा त्यांना करटुले हे माळकऱ्यांचे मटण असल्याचे सांगत. यामुळे कृष्णा यांनी या पिकाची लागवड केली पाहिजे असे ठरवले. यासाठी त्यांनी स्थानिक कृषी कार्यालयाचा सल्ला घेतला. कृषी कार्यालयाने या शेतीबाबत त्यांना सविस्तर माहिती दिली. या पिकाच्या शेतीबाबत माहिती मिळाल्यानंतर कृष्णा यांनी 2019 साली आपल्या अर्धा एकर जमिनीवर या पिकाची लागवड केली.
विशेष म्हणजे लागवड केल्यानंतर पहिल्याच वर्षी त्यांना या पिकातून तीन लाखांचे उत्पन्न मिळाले. फक्त अर्धा एकर जमिनीतून तीन लाखांचे उत्पन्न मिळाले असल्याने त्यांनी करटूल्याची लागवड वाढवली. सध्या स्थितीला त्यांनी दोन एकर जमिनीवर कर्टुल्याची लागवड केली आहे. एक-एक एकराचे दोन प्लॉट त्यांच्याकडे आहेत. या प्लॉटमधून त्यांना जुलै 2023 पासून उत्पादन मिळत आहे. 15 जुलैला त्यांनी या पिकाचा पहिला तोडा काढला आहे.
आतापर्यंत त्यांना एका प्लॉटमधून चार तोडे आणि एका प्लॉटमधून तीन तोडे मिळाले आहेत. दर आठवड्याला साधारणता त्यांना एका प्लॉटमधून दोन क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत आहे. याचाच अर्थ त्यांना दर आठवड्याला दोन प्लॉटमधून चार क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या या पिकाला सरासरी 121 चा भाव मिळाला आहे. यामुळे त्यांना सर्व खर्च वजा जाता आत्तापर्यंत दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा राहिला आहे.
कृष्णा सांगतात की 2018 पर्यंत ते देखील इतर शेतकऱ्यांप्रमाणे पेरणीच्या काळात उधारीने औषध आणि बी-बियाण्यांची खरेदी करत. मात्र शेतीमधून त्यांना चांगले उत्पादन मिळत नव्हते. परिणामी उधारीचा पैसा फेडला जात नव्हता. यामुळे ते कर्जबाजारी झाले होते. पण या पिकाच्या शेतीतून त्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढले आहे.
या पिकांमधून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांच्याकडे आता शिल्लक पैसा जरी नसला तरी ते कर्जबाजारी नाहीयेत. एकंदरीत मराठवाड्यातील हा शेतकरी आपल्या कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावर कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यास यशस्वी ठरला आहे.
ते सांगतात की कर्टुल्याचा हंगाम हा नोव्हेंबर पर्यंत चालतो. यंदा मात्र दुष्काळी परिस्थिती असल्याने ऑक्टोबर पर्यंतच हा हंगाम चालणार आहे. परंतु या विपरीत परिस्थितीमध्येही त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळाले असल्याने दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील कृष्णा समाधानी आहेत. मात्र या पिकाच्या शेतीमध्ये काही खबरदारी घ्यावी लागते. या पिकावर नागअळी आणि डाऊनी या रोगाचा प्रादुर्भाव होतो. यामुळे या रोगावर वेळीच नियंत्रण मिळवावे लागते.
दरम्यान करटुले लागवड केल्यानंतर अवघ्या दीड ते दोन महिन्यांच्या काळात या पिकातून उत्पादन मिळत असल्याचे कृष्णा यांनी सांगितले आहे. एकंदरीत या पिकाची शेती सुरू केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या काळात यापासून शेतकऱ्यांना उत्पादन मिळू लागते. यामुळे कृष्णा यांना हे पीक फायदेशीर ठरले आहे.