Maharashtra Successful Farmer : अलीकडे शेतीमध्ये वेगवेगळे बदल पाहायला मिळत आहेत. शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये यांत्रिकीकरणाचा मोठा वापर केला आहे. याशिवाय पिक लागवडीच्या पद्धतीत देखील आता बदल होऊ लागले आहेत. आंतरपीकांची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात असाच एक भन्नाट प्रयोग समोर आला आहे. जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्याच्या लहान तांडा या गावातील प्रयोगशील शेतकऱ्याने केळीच्या पिकात खरबुजची आंतरपीक म्हणून लागवड करत लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे.
यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. बालाजी राठोड यांनी ही किमया साधली आहे. राठोड यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्याकडे आठ एकर जमीन आहे.
राठोड आपल्या शेतात केळी, हळद, सोयाबीन आणि कापूस यांसारख्या पिकांची शेती करत असतात. यातील केळी आणि हळद या पिकातून उत्पादन मिळवण्यासाठी मात्र त्यांना एक वर्षभर वाट पाहावी लागते.
अशा परिस्थितीत त्यांनी केळीच्या पिकात आंतरपीक म्हणून खरबूज लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सव्वा दोन एकर जमिनीत केळीची 2900 रोपे लावली आहेत.
याच केळीच्या बागेत त्यांनी 1600 खरबूज रोपांची लागवड केली.राठोड यांनी सात फुट अंतरावर खरबूज रोपाची लागवड केली. आता त्यांना यातून उत्पादन मिळाले आहे.
आतापर्यंत 21 टन खरबूज त्यांना मिळाले असून प्रति किलो 20 ते 25 रुपये असा दर मिळाला आहे. यामुळे त्यांना खरबुजाच्या पिकातून तीन लाखांपर्यंतची कमाई झाली आहे. यातून त्यांना आणखी पाच टन माल मिळणार आहे.
म्हणजेच उत्पन्नाचा आकडा आणखी वाढणार आहे. आणखी एक लाख रुपयांची कमाई होईल असा त्यांचा अंदाज आहे. म्हणजेच फक्त खरबूज पिकातून त्यांना चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
यासाठी त्यांनी सव्वा लाख रुपयांचा खर्च केला आहे. दुसरीकडे केळीच्या पिकातूनही त्यांना चांगली कमाई होणार आहे. राठोड यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना एका पिकाच्या खर्चातून दोन पिकांचे उत्पादन मिळाले आहे.
यामुळे कमाईचा आकडा हा वाढला आहे. एकंदरीत राठोड यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी देखील मोठा प्रेरक राहणार आहे.