Maharashtra Successful Farmer : अलीकडे शेती परवडत नाही, शेतीत आता काही मजा उरली नाही, शेतीपेक्षा आपली 12 घंट्याची नोकरी बरी, असा सूर आवळला जात आहे. विशेष म्हणजे असा ओरड करणारे सर्वजण 21 ते 25 वर्षातील तरुण पिढी आहे. खरं बघायला गेलं तर या तरुणांचं असं म्हणणं काहीच गैर नाही. तरुणांची अशी मानसिकता होण्यामागे अनेक कारणे आहेत.
यामध्ये महत्त्वाचे म्हणजे शासनाचे शेतीविरोधातील धोरणे, नैसर्गिक आपत्ती, व्यापाऱ्यांची मुजोरी, व्यापारी आणि शासन यांच्यातील असलेली मिलीभगत यामुळे कुठे ना कुठे बळीराजा भरडला जात आहे. हेच कारण आहे की आता नवयुवक तरुणांना शेतीमध्ये रस राहिलेला नाही.
आपला बाप दिवसातील झोपण्याचे आठ घंटे वजा करता उर्वरित वेळ ज्या काळ्या आईसाठी घालवतो तेथून पोटाची खळगी भरेल एवढेही उत्पन्न मिळत नसल्याने हतबल झालेली नवीन पिढी आता शहराकडे मार्गक्रमण करू लागली आहे. शेतीमध्ये उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी गत आहे यामुळे आता तरुण वर्ग गावाकडची माणसं सोडून शहराकडे आपला आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी पलायन करत असल्याचे चित्र आहे.
जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर गावच्या-गाव ओस पडणार आहेत. मात्र या अशा विपरीत परिस्थितीत देखील काही शेतकऱ्यांनी शेतीमधून चांगले उत्पन्न कमवून दाखवले आहे. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील अवघ्या चार महिन्यांच्या काळात लाखो रुपयांची कमाई केली आहे.
जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील लिंबाळा येथील प्रयोगशील शेतकरी मंगेश शिवराजआप्पा धनासुरे यांनी या चार महिन्यांच्या काळात तब्बल 32 लाखांचे उत्पन्न कमावले आहे. यामुळे सध्या धनासुरे यांची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे. धनासुरे यांनी पपई आणि टरबूज लागवडीतून चार महिन्यांच्या काळात 32 लाखांची कमाई करून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.
मंगेश यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी त्यांच्या साडेसहा एकर जमिनीवर पपईची शेती केली आहे. त्यांनी डिसेंबर 2022 मध्ये साडे सहा एकर जमिनीत तब्बल सात हजार रोपांची लागवड केली होती. पपई लागवडीसाठी त्यांना जवळपास सहा लाख रुपये खर्च करावा लागला होता.
मात्र पपई लागवडीनंतर अवघ्या आठ महिन्यांच्या काळात त्यांना पपईपासून उत्पादन मिळू लागले. योग्य व्यवस्थापन केल्याने पपई पासून त्यांना लवकर उत्पादन मिळाले. विशेष म्हणजे त्यांनी उत्पादित केलेली पपई खूपच दर्जेदार होते यामुळे बाजारात पपईला चांगला भाव देखील मिळाला. गेल्या ऑगस्ट महिन्यांपासून ते पपईची विक्री करत आहेत.
कितीची विकली पपई
मंगेश यांनी सांगितल्याप्रमाणे, दर पंधरा दिवसाला ते वीस टन माल विकत आहेत. वीस रुपये प्रति किलो असा भाव सध्या मालाला मिळत आहे. म्हणजेच दर पंधरा दिवसांनी तीन लाखांपर्यंतची कमाई त्यांना होत आहे. आतापर्यंत त्यांनी पपई विक्रीतून जवळपास 24 लाखांची कमाई केली आहे. म्हणजेच अवघ्या चार महिन्यांच्या काळात त्यांना पपई बागेतून 24 लाख रुपये मिळाले आहेत.
यातून खर्च वजा जाता त्यांना 18 लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे. विशेष म्हणजे पपई काढणी झाल्यानंतर त्यांनी लगेच त्या जागेवर टरबूज लागवड केली होती. टरबूजपासूनही त्यांना चार महिन्यांच्या काळात 160 टन एवढे दर्जेदार उत्पादन मिळाले आहे. यातूनही त्यांना जवळपास 18 लाखांची कमाई झाली आहे. या पिकासाठी त्यांना चार लाखाचा खर्च आला आहे म्हणजेच खर्च वजा जाता टरबूज मधूनही त्यांना 14 लाख रुपये मिळाले आहेत.
एकंदरीत पपई आणि टरबूज या दोन्ही पिकांच्या शेतीतून त्यांना 32 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. निश्चितच मंगेश यांची ही कामगिरी इतरांसाठी देखील मार्गदर्शक राहणार आहे. यामुळे इतर प्रयोगशील शेतकरी देखील शेतीमध्ये विविध प्रयोगाच्या माध्यमातून चांगले उत्पन्न कमावतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.