Maharashtra Successful Farmer : अलीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाहीये. त्यामुळे आता अनेकांनी शेतीला रामराम ठोकत दुसऱ्या उद्योगधंद्यांना सुरुवात केली आहे.
सातत्याने शेतीचा व्यवसाय तोट्यात जाऊ लागल्याने अनेक शेतकरी कुटुंबातील नवयुवक तरुणांनी इतर उद्योगधंद्यांची कास धरली आहे. मात्र अशा या विपरीत परिस्थितीमध्ये देखील काही शेतकऱ्यांनी शेतीमधून चांगले उत्पन्न मिळवून दाखवले आहे.
दरम्यान आज आपण अशा एका शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने अवघ्या दोन एकरात 75 लाखांची कमाई केली आहे. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही मात्र ही किमया साधली आहे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील शेतकरी जालिंदर सोळसकर यांनी.
जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथील शेतकरी जालिंदर यांनी दोन एकरात लावलेल्या ढोबळी मिरची अर्थातच शिमला मिरचीच्या शेतीतून तब्बल 75 लाखांची कमाई केली आहे. त्यामुळे सध्या जालिंदर यांची पंचक्रोशीत विशेष चर्चा पाहायला मिळत आहे.
जालिंदर यांचे गाव व आजूबाजूचा परिसर हा एक दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र दुष्काळी पट्ट्यात जालिंदर यांनी अवघ्या दोन एकरात लाखो रुपयांची कमाई करून इतर प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी असे उदाहरण सेट केले आहे.
खरे तर या गावात पिण्याच्या पाण्यासाठी देखील वणवण भटकंती करावी लागते. पण जालिंदर यांनी पाण्याच योग्य व्यवस्थापन करून तरकारी पीक लागवडीतून चांगले उत्पन्न मिळवले आहे.
जालिंदर यांनी दोन एकरात शिमला मिरचीची लागवड केली. पाण्यासाठी ड्रिप इरिगेशनचा वापर केला. मल्चिंग पेपर आणि मांडव पद्धतीचा उपयोग करून त्यांनी शिमला मिरचीची लागवड केली.
या पिकासाठी त्यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या औषधांची फवारणी केली आहे. ही शिमला मिरची लागवड करून आता त्यांना पाच महिन्यांचा कालावधी झाला आहे. या कालावधीत त्यांनी 13 वेळा मिरचीची तोडणी केली आहे.
यातून त्यांना जवळपास 150 टन माल मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यांना जवळपास आठ महिन्यांपर्यंत यातून उत्पादन मिळत राहणार आहे.
म्हणजे आणखी तीन महिने यातून त्यांना उत्पादन मिळेल. मिरचीच्या पिकासाठी त्यांना दहा लाख रुपयांचा खर्च आला आहे. अशा तऱ्हेने या पिकातून त्यांना 65 लाख रुपयांची निव्वळ कमाई होणार आहे.