Maharashtra ST Bus : महाराष्ट्रात रेल्वेनंतर लाल परीने अर्थातच एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. विशेष म्हणजे एसटी महामंडळाकडून आपल्या प्रवाशांसाठी विविध सवलती देखील पुरवल्या जात आहेत.
राज्य शासनाकडून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना 100% सवलतीवर एसटीचा प्रवास उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच सर्वच वर्गातील महिलांना एसटी प्रवासात 50% एवढी सवलत दिली जात आहे.
अशातच आता एसटी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता काही लोकांना सलग सहा महिन्यांपर्यंत लाल परीचा प्रवास मोफत करता येणार आहे.
मात्र याचा लाभ काही विशिष्ट लाभार्थ्यांनाच उपलब्ध होणार आहे. दरम्यान आता आपण एसटी महामंडळाच्या या निर्णयाची सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणाला मिळणार लाभ ?
एसटी महामंडळाने जारी केलेल्या सुधारित परिपत्रकानुसार आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या, ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या तसेच वैद्यकीय कारणांमुळे अपात्र ठरलेल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वयाच्या 75 वर्षांपर्यंत सलग सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एसटीचा मोफत प्रवास करता येणार आहे.
यासाठी त्यांना पास मिळणार आहे. याशिवाय, एसटी महामंडळातील सेवेत असताना मृत्यू पावलेल्या, सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झालेल्या, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या, स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विधवा, विधूर यांना वयाच्या ६५ वर्षापर्यंत दरवर्षी सलग सहा महिन्यांसाठी मोफत एसटीचा प्रवास उपलब्ध होणार आहे.
यामुळे या निर्णयाचा आता या संबंधित लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. खरे तर याआधी मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीला वर्षातून केवळ एका महिन्याचा मोफत प्रवासाचा पास दिला जात असे. आता मात्र हा पाच सहा महिन्यांसाठी दिला जाणार आहे.
या कालावधीतच मोफत प्रवास करता येणार
मात्र या मोफत पासचा वापर करून फक्त सप्टेंबर ते फेब्रुवारी या ऑफ सीझनमध्येच प्रवास करता येणार आहे. सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यांच्या कालावधीत सलग या पासचा वापर करून या संबंधित लाभार्थ्यांना मोफत प्रवास करता येईल. या निर्णयाचा हजारो लोकांना फायदा होणार अशी माहिती समोर येत आहे.