Maharashtra Soybean Rate : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात दबावात आहेत. पिवळ्या सोयाबीनला यंदा गेल्या पाच वर्षातील सर्वात कमी दर मिळतोय. एकीकडे उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत आहे, तर दुसरीकडे सोयाबीनचे दर दिवसेंदिवस कमी होत असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिकासाठी आलेला खर्च नेमका भरून कसा काढायचा ? हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकला आहे.
यामुळे, शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा आहे. सध्या देशांतर्गत बाजारांमध्ये सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नसून बाजारातील अभ्यासकांनी आगामी काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहणार असे म्हटले आहे. ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटिना सारख्या देशांमध्ये सोयाबीनचे उत्पादन वाढत असल्याने सोयाबीनचे दर सध्या दबावात आहेत.
जागतिक पातळीवर सोयाबीनचे दर दबावत असल्याने याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना देखील बसतोय. सोयाबीन अनेक ठिकाणी हमीभावापेक्षा कमी दरात विकला जात असून आगामी काळात भाव वाढ होण्याची आशा मावळली असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
दरम्यान, आज राज्यातील काही बाजारांमध्ये सोयाबीनचे कमाल किमान अन सरासरी दर थोडेसे सुधारले आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज खानदेशातील जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे.
यासोबतच आज किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील सोयाबीनला चांगला दर मिळाला असून या संबंधित बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्रीसाठी दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तथापि सोयाबीनचे दर अजून वाढले पाहिजेत अशी अपेक्षा देखील शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खानदेशातील जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 303 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या बाजारात आजच्या लिलावात सोयाबीनला कमाल 4892, किमान 4892 आणि सरासरी 4892 असा दर मिळाला आहे.
यासोबतच किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 284 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून या बाजारातही सोयाबीनला 4892 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. या दोन्ही बाजारांमध्ये मिळालेला हा दर आजचा सर्वाधिक दर होता.