Maharashtra Rain : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची काळजी वाढवणारी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे.
विशेष म्हणजे राज्यात आगामी काही दिवस वादळी पावसाची शक्यता कायम राहील असा अंदाज समोर आला आहे. खरेतर, महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा तापमानाचा पारा वाढू लागला आहे.
राज्यातील काही भागांमध्ये दिवसाचे कमाल तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. तर बहुतांशी भागात तापमान 40°c पार केले आहे. दुसरीकडे काही ठिकाणी अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे.
अवकाळी पाऊस महाराष्ट्राची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यापासून तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून ही परिस्थिती सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक आहे.
वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असल्याने राज्यातील विविध भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतं आहे.
हवामान खात्याने आज 27 एप्रिल 2024 रोजी राज्यातील विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर सदर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र मुंबईसह संपूर्ण कोकणात आज उष्ण आणि दमट हवामान राहणार, काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार असा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेची लाट येऊ शकते अशी शक्यता भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
शिवाय, IMD ने राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होत असून, पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचे म्हटले आहे.
यामुळे आज मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, धाराशीव, लातूर, आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सदर दहा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.