Maharashtra Rain : सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हवामान खात्याने देशातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याची मोठी घोषणा केली. त्यानुसार सध्या देशातील विविध राज्यातून मान्सूनने माघार घेतली आहे.
राज्यातील राजस्थान, हरियाणा, दिल्ली यांसारख्या राज्यांमधून मान्सून परतला आहे. त्यामुळे आता या संबंधित राज्यांमध्ये हिवाळ्याची चाहूल लागली आहे. पण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात अजूनही मोसमी पाऊस सुरू आहे.
अजून राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला नाही. परंतु येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातूनही मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. हवामान खात्याने गेल्या काही दिवसांपूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातून 10 ऑक्टोबर नंतर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.
तत्पूर्वी मात्र पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढणार असल्याचे चित्र तयार होत आहे. हवामान खात्याने राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज नुकताच वर्तवला आहे. वास्तविक, राज्यात गेल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात चांगला जोरदार पाऊस झाला आहे.
परंतु जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याने सप्टेंबर मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे देखील या दोन महिन्यातील पावसाची तूट भरून निघालेली नाही. हेच कारण आहे की अजूनही महाराष्ट्रात पावसाने सरासरीचा टप्पा गाठलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यापर्यंत सरासरीच्या 96 टक्के एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. संपूर्ण देशाचा विचार केला तर सप्टेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण देशभरात 94% एवढे पावसाची नोंद झाली आहे. यामुळे ऑक्टोबर महिन्यातही जोरदार पाऊस झाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. दरम्यान हवामान खात्याने आगामी काही तासांसाठी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासा देणारी आणि अतिशय गोड बातमी ठरणार आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, आगामी 24 तास राज्यातील कोकण आणि विदर्भ विभागातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
एवढेच नाही तर आगामी 48 तासांमध्ये राज्यातील मुंबई, पुणे आणि ठाण्यांमध्ये अधूनमधून पावसाच्या जोरदार सऱ्या बरसणार असल्याचे सांगितले जात आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात सध्या पावसासाठी पोषक हवामान तयार होत असून आगामी काही तासांमध्ये राज्यातील कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे तसेच राजधानी मुंबई आणि ठाण्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.