Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या दहा ते अकरा दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. 8-9 तारखेला महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. काही ठिकाणी सात मेला देखील पावसाने हजेरी लावली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत राज्यात भाग बदलत वादळी पाऊस सुरू आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण म्हणजेच महाराष्ट्रात सगळीकडेच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
अशातच आता भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी वाढणार असल्याचा अंदाज जारी केला आहे. गेल्या दहा ते अकरा दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस आणखी काही दिवस महाराष्ट्रात थैमान माजवणार असे चित्र तयार होत आहे.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाण, आणखी सहा दिवस म्हणजेच 24 मे 2024 पर्यंत वादळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. या कालावधीत मराठवाडा आणि विदर्भात सगळ्यात जास्त पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये या कालावधीत गारपीट होणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.
IMD ने सांगितल्याप्रमाणे, उत्तर कोकणातील मुंबई, पालघर, ठाणे आणि दक्षिण कोकणातील रायगड वगळता उर्वरित दोन जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेची लाट आणि आर्द्रता कायम राहण्याची शक्यता आहे.
पण, या भागात दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात अशी शक्यता आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील अवकाळी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे मात्र येत्या दोन दिवसात या विभागात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी वादळी पाऊस पाहायला मिळू शकतो असा अंदाज आहे.
एकंदरीत, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस महाराष्ट्रात आणखी काही दिवस मुक्कामाला राहणार आहे. 24 तारखेपर्यंत महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा मुक्काम पाहायला मिळेल मात्र हवामान प्रामुख्याने कोरडे राहील अशी आशा आहे.
तसेच जून महिन्यात महाराष्ट्रात वेळेवर मान्सूनचे आगमन होईल असे बोलले जात आहे. दरम्यान, आता आपण 24 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पाहायला मिळू शकतो याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर, धाराशिव आणि विदर्भ विभागातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये 24 मे 2024 पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच जळगाव, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यात आज पावसाचा अंदाज आहे. यातील मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीट होणार असेल देखील म्हटले जात आहे.