Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सर्व दूर जोरदार पाऊस सुरू होता. मात्र काल आणि आज राज्यातील काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा परिसरावर पाऊस सुरूये मात्र राज्याच्या इतर भागांमध्ये पावसाने थोडीशी उघडीप घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने खरीप हंगामातील पिकांवर याचा विपरीत परिणाम होत होता. पण, काल आणि आज राज्याच्या काही भागात पावसाने विश्रांती घेतल्याने याचा पिकांना फायदा होणार आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यातील हवामानात बदल झाला असून महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज दिला आहे.
उद्यापासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असा अंदाज आहे. आय एम डी ने आज कोल्हापूर, सातारा, पुणे वगळता संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमी राहणार असे म्हटले आहे.
पण, उद्यापासून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहील मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात आता पावसाचा जोर वाढणार आहे.
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती या भागात उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच, गुरुवारी आणि शुक्रवारी मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण आणखी वाढणार आहे.
हे दोन दिवस विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्याबाबत बोलायचं झालं तर हे दोन दिवस मराठवाड्यातील सर्वच्या सर्व 8 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यांमध्ये काही भागात हलका पाऊस तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.