Maharashtra Rain : गेल्या जून महिन्यात महाराष्ट्रातील कोकण आणि घाटमाथा परिसर वगळला तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर हा फारच कमी होता. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, जून महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मात्र आयएमडीने जुलै महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. या महिन्यात राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये 106% पाऊस पडणार असे म्हटले गेले आहे.
तसेच काही बोटावर मोजण्या इतक्या जिल्ह्यात या महिन्यात सरासरी एवढा पाऊस पडणार आहे. परंतु जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटला असतानाही राज्यात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही ही वास्तविकता आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
पुण्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. आकाशात ढगांची गर्दी असते मात्र प्रत्यक्षात पाऊस पडत नाही. ढगांच्या दाट गर्दीमुळे अन पावसाळी वातावरणामुळे दररोज मोठा पाऊस पडेल असे वाटते मात्र गेली कित्येक दिवस असेच वातावरण कायम राहूनही पुण्यात अजून जोरदार पाऊस झालेला नाही.
यामुळे नेमका पावसाला ब्रेक का लागत आहे, पावसाळी वातावरण असतानाही जोरदार पाऊस का पडत नाही असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. दरम्यान सेवानिवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी असे म्हटले आहे की, सध्या मान्सून मध्ये ऊर्जा नाही.
जोरदार मोसमी पावसासाठी मान्सून मध्ये बळकटी नाहीये. हेच कारण आहे की आकाशात ढगांची दाट गर्दी होत असतानाही प्रत्यक्षात पाऊस पडत नाहीये. पण आता ही परिस्थिती चेंज होणार असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
आता मान्सूनला बळकटी मिळण्यास सुरुवात झाली असून येत्या तीन-चार दिवसांनी जोरदार पाऊस पडू शकतो असे खुळे यांनी स्पष्ट केले आहे. आज पासून पुढील चार दिवस म्हणजेच 9 जुलै पर्यंत पुण्यात चांगला पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्राबाबत बोलताना खुळे यांनी महाराष्ट्रात चांगल्या समाधानकारक पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. यानुसार, मुंबई सह कोकण आणि विदर्भात पाऊस सुरू आहे. पण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण फारच कमी आहे.
मध्य महाराष्ट्रात येत्या दोन-तीन दिवसांनी पाऊस सुरू होऊ शकतो असे चित्र आहे. मात्र मराठवाड्यात तेव्हाही पावसाचे प्रमाण कमीच राहील असे दिसत आहे. तथापि, येत्या चार-पाच दिवसांनी अर्थातच 10 जुलैपासून पुन्हा एकदा वातावरणात बदल होणार आहे.
तेव्हाच पावसाबाबत योग्य तो अचूक अंदाज सांगता येईल असे देखील खुळे यांनी यावेळी नमूद केले. यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात नेमकी कधी होणार? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहिला आहे.
परंतु दहा जुलै नंतर वातावरणात बदल होणार असा अंदाज असल्याने दहा जुलै नंतर का होईना पण जोराचा पाऊस पडावा अशी आशा व्यक्त केली जात आहे.