Maharashtra Rain : राज्यात पुन्हा एकदा पावसाच पुनरागमन झाले आहे. गेली काही दिवस पावसाची उघडीप होती. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली होती. नंतर 1 अन 2 सप्टेंबरला राज्यात मुसळधार पाऊस झाला. 3 सप्टेंबरला राज्यातील पावसाचा जोर कमी झाला, पण काही भागात पावसाची हजेरी लागली.
मात्र तदनंतर पाऊस विश्रांतीवर गेला. पण आता गेल्या 2 दिवसापासून हवामान बदललं आहे, बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असल्याने महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
महत्वाचे म्हणजे आज पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. IMD ने म्हटल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता आता आणखी वाढणार आहे अन याच्या प्रभावामुळे आज राज्यातील जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
यातील काही जिल्ह्यात तर अतिजोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. तसेच खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या अनुषंगाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान आता आपण राज्यातील कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट दिलाय यासंदर्भात माहिती पाहणार आहोत.
कुठं बरसणार अतिजोरदार पाऊस?
वायव्य बंगालच्या उपसागरात वादळी प्रणाली म्हणजे कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून या डीप डिप्रेशनची तीव्रता आणखी वाढली असल्याने पूर्व विदर्भात पावसाची तीव्रता वाढणार आहे.
पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आज अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर या तिन्ही जिल्ह्यांना आज आयएमडी कडून ऑरेंज अलर्ट मिळाला आहे.
तसेच आज दक्षिण कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय आज खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये, मराठवाडा विभागातील हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर अन विदर्भ विभागातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या संबंधित जिल्ह्यांना सुद्धा आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.