Maharashtra Rain : गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धुमाकूळ घातला आहे. 9 फेब्रुवारीपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिक गारपिटीने वाया गेले आहे. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक गारपिटेने हिरावून घेतले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अशातच आता भारतीय हवामान विभागाने 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून अर्थातच 13 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील थंडीचा जोर कमी होण्यास सुरुवात होणार आहे.
म्हणजेच भविष्यात आता किमान आणि कमाल तापमानात वाढ होईल आणि उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे. दुसरीकडे मराठवाड्यात आगामी आठ दिवस अर्थातच 20 फेब्रुवारी पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या कालावधीत मराठवाड्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार असा अंदाज आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
याशिवाय महाराष्ट्राच्या राजधानीत अर्थातच मुंबईमध्ये सध्या थंडीचा जोर वाढला आहे. विशेष म्हणजे हा जोर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
तेथील किमान तापमान कमालीचे कमी झाले असून यामुळे मुंबईमधील थंडीची तीव्रता वाढलेली आहे. मात्र असे असले तरी मुंबईमध्ये काही दिवस ढगाळ हवामान देखील तयार होईल असा अंदाज आहे. पण, मुंबईत अवकाळी पावसाची शक्यता जवळपास नगण्य आहे.
विदर्भाला अवकाळीचा अन गारपिटीचा फटका
9 फेब्रुवारीपासून विदर्भात अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले. 10 फेब्रुवारीला विदर्भातील काही भागात गारपीट झाली. विशेष म्हणजे अकरा आणि 12 फेब्रुवारीला देखील विदर्भ विभागातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची आणि गारपीटीची हजेरी पाहायला मिळाली आहे.
यामुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भातील वर्धा जिल्ह्यात दोन दिवस गारपीट झाली. त्यामुळे तेथील शेकडो एकर वरील शेती पिके वाया गेली आहेत. देवळी, आर्वी, हिंगणघाट, समुद्रपूर या तालुक्यात गारपीट झाली आहे.
या परिसरातील गहू, हरभरा तसेच कापूस व इतर भाजीपाला पिके जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.