Maharashtra Rain : ऑगस्ट महिन्यात पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली. यामुळे संपूर्ण खरिप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली. महाराष्ट्र अगदी दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला. दरम्यान सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात जोरदार पावसाची हजेरी लागली.
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातील तीन ते चार दिवस राज्यात पाऊस बरसला. यामुळे ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून निघेल असे बोलले जाऊ लागले. मात्र 10 सप्टेंबर नंतर राज्यातून पुन्हा एकदा पाऊस गायब झाला. यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात आलेत. अशा स्थितीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. येत्या काळात जर राज्यात पाऊस पडला नाही तर पाणी संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन विभागात खूपच कमी प्रमाणात पाऊस झाला असून या विभागातील शेतकऱ्यांच्या सध्या आभाळाकडे नजरा आहेत. अशातच भारतीय हवामान विभागाने 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळू शकतो असे सांगितले जात आहे. मुंबईच्या हवामान खात्याने राज्यातील मराठवाडा विभागात 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या व्यतिरिक्त राज्यातील इतरही भागात 23 सप्टेंबर पर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूर या दोन जिल्ह्यांमध्ये या काळातही पाऊस पडणार नसल्याचे सांगितले जात आहे. आधीच या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे खरिपातील पिकांनी माना टेकल्या आहेत.
अशातच आता 23 तारखेपर्यंत मराठवाड्यात पाऊस पडणार मात्र उस्मानाबाद आणि लातूर या दोन जिल्ह्यात पाऊस होणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याने तेथील शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढणार आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, 21 सप्टेंबर 2023 ला हिंगोली, परभणी, नांदेड या तीन जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. 22 सप्टेंबरला छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच 23 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना आणि बीड या तिन्ही जिल्ह्यात पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत या संबंधित भागांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटरच्या वेगाने जोरदार वारे वाहणार असा देखील अंदाज आहे.