Maharashtra Rain : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतली आहे. ऑगस्ट महिन्यात जवळपास 25 ते 26 दिवस पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यानंतर सप्टेंबर महिन्यात राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली होती.
सात सप्टेंबर अर्थातच गोपाळकाल्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढला आणि नऊ ते दहा सप्टेंबर पर्यंत राज्यातील बहुतांशी भागात पावसाने हजेरी लावली. काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. त्यामुळे व्हेंटिलेटर वर पोहोचलेली खरीप हंगामातील पिके पुन्हा एकदा टवटवीत झाली.
यामुळे आता पिकांची चांगली जोमदार वाढ होणार अशी आशा शेतकऱ्यांना होती. अशातच मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा राज्यातून पाऊस गायब झाल्याचे चित्र आहे. कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे पण उर्वरित राज्यातून पावसाने काढता पाय घेतला आहे.
दरम्यान राज्यात आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असे सांगितले जात आहे. आज राज्यातील विदर्भ विभागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील पूर्व भागात आज जोरदार पाऊस पडणार तर विदर्भातील उर्वरित भागात विजाच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
उर्वरित राज्यात मात्र विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्याने आणि येत्या काही तासात या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आणखी वाढणार असल्याने येत्या काही दिवसात महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडू शकतो असे सांगितले जात आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 13 सप्टेंबर 2023 रोजी राज्यातील व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने या तिन्ही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधीत जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे.