Maharashtra Rain : राज्यात आता गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमधील किमान तापमान वाढत आहे. किमान तापमानात वाढ होत असल्याने राज्यातील गारठा आता थोडासा कमी झाला आहे.
खरंतर डिसेंबर महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने झाली होती. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची हजेरी लागली. पावसाळी वातावरणामुळे आणि ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मोठा विपरीत परिणाम झाला.
पण गेल्या दोन आठवड्यांपासून थंडीची तीव्रता वाढली होती. उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडत असल्याने उत्तरेतून थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत होते. यामुळे राज्यातही गारठा वाढू लागला होता.
आता मात्र उत्तरेकडील राज्यांमध्येही थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. त्या ठिकाणीही किमान तापमान वाढले असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी आता महाराष्ट्रातही गारठा कमी झाला आहे.
दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यांमधून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात सध्या ढगाळ हवामानाची परिस्थिती तयार होत आहे. राज्यातील काही भागात या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे ढगांची निर्मिती झाली आहे.
विशेष म्हणजे वातावरणात झालेल्या या बदलामुळे महाराष्ट्रात या चालू वर्षाच्या सरते शेवटी आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला सकाळी पाऊस हजेरी लावणार असा देखील अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आगामी काही दिवस महाराष्ट्रातील किमान आणि कमाल तापमान थोडेसे वाढण्याची शक्यता आहे. किमान तापमानात पुढील काही दिवस दोन ते तीन अंशाने वाढ होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील गारठा कमी होणार आहे.
तथापि रात्री अजूनही थंडीची अनुभूती येत आहे. रात्री अजूनही काही भागात कडाक्याची थंडी पडत आहे. अशातच हवामान खात्याने नववर्षाच्या सुरुवातीला आणि या चालू वर्षाच्या सरते शेवटी महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज दिला आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वर्षाअखेरीस आणि नववर्षाच्या अगदी सुरुवातीलाच राज्यात पाऊस हजेरी लावणार आहे. हवामान खात्याने म्हंटल्याप्रमाणे, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.
धुळे आणि जळगाव या दोन जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो असे हवामान खात्याने म्हटले आहे. एकंदरीत आता जानेवारी महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसानेच होण्याची शक्यता आहे. नववर्षाची सुरुवात अवकाळी पावसाने होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढणार आहे.