Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान कोरडे झाले आहे. राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे असल्याने थंडीची तीव्रता आता हळूहळू वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असल्याने आणि जम्मू-काश्मीर तसेच हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने महाराष्ट्रातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर वाढत आहे.
दुसरीकडे देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीत दक्षिणेकडील राज्यांमधून बाष्प युक्त वारे राज्यातील काही भागांमध्ये येत आहेत याचा परिणाम म्हणून राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये कमाल आणि किमान तापमानात काहीशी वाढ होत आहे.
परिणामी, त्या भागांमध्ये अजूनही अपेक्षित अशी थंडी पडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरी या भागांमध्येही आगामी काही दिवसात थंडीचा जोर वाढू शकतो असा अंदाज आहे.
असे असतानाच मात्र राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यातील हवामानात आता मोठा बदल झाला असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.
खरेतर गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
आता पुन्हा एकदा सरत्या वर्षात आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस हजेरी लावणार असे सांगितले जात आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार दिवसात राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी 2024 रोजी अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे. विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील इतरही अनेक राज्यांमध्ये या कालावधीत मुसळधार पाऊस पडणार अशी शक्यता आहे.
आय एम डी ने जारी केलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजात तामिळनाडूतील किनारपट्टीवरील काही भागांत, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. परिणामी, या संबंधित राज्यातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढू शकते.
सोबतच जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी आणि पाऊस बरसणार असा अंदाज आहे. याशिवाय, पश्चिम राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग आणि दिल्ली-एनसीआरमध्ये पाऊस पडणार असे IMD ने सांगितले आहे. डोंगराळ भागात तर मुसळधार पाऊस हजेरी लावणार असे IMD ने सांगितले आहे.