Maharashtra Rain : दिवाळीचा सण मात्र काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या चार दिवसात दिवाळीचा सण साजरा होणार आहे. यामुळे सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. अशातच आता राज्यातील हवामानात एक मोठा चेंज आला आहे. यंदा दिवाळीच्या काळात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
खरंतर, यावर्षी अगदी मान्सून काळापासूनच निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी काळात पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला होता. आता खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे.
काही ठिकाणी खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण झाली आहे तर काही ठिकाणी ही कामे सध्या स्थितीला अंतिम टप्प्यात आली आहेत. सोयाबीनची काढणी सुरू आहे तर कापसाची वेचणी करण्यासाठी शेतकरी बांधव आपल्या परिवारासमवेत शेतशिवारात लगबग करत आहेत.
तसेच ज्या भागात सोयाबीन आणि कापसाची हार्वेस्टिंग पूर्ण झाली आहे तेथील शेतकरी बांधव आता मालाची विक्री करू लागले आहेत. शिवाय काही ठिकाणी रब्बी हंगामातील पिकांची पेरणीही सुरू झाली आहे.
तर काही भागात पेरणीची कामे पूर्ण देखील झाली आहेत. अशातच आता राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून हवामान खात्याने मध्य महाराष्ट्रातील आणि कोकणातील दक्षिण भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सांगली, सातारा, कोल्हापूर आणि दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आगामी दोन दिवस पाऊस बरसण्याची शक्यता आहे. याशिवाय हवामान खात्याने खानदेशात देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे.
काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये आयएमडीच्या हवाल्यातून पावसाबाबत एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. यानुसार खानदेश मधील जळगाव जिल्ह्यात दहा नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
अर्थातच जळगाव जिल्ह्यात ऐन दिवाळीच्या काळातच पाऊस हजेरी लावणार अशी शक्यता आहे. यामुळे खरीप हंगामातील हार्वेस्टिंग साठी तयार झालेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र हा पाऊस रब्बी हंगामासाठी पोषक राहील अशी देखील शक्यता आहे.
यामुळे या अवकाळी पावसाचा काही शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तर काही शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी हार्वेस्टिंगसाठी तयार झालेल्या पिकाची पावसाचे वातावरण पाहून काढणी करून घेणे अपेक्षित आहे.
तसेच काढणी झालेला माल सुरक्षित ठिकाणी साठवावा असे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाने दहा नोव्हेंबर पासून राज्यातील विदर्भात थंडीचा जोर वाढेल असा अंदाजही व्यक्त केला आहे. एकंदरीत निसर्गाचा लहरीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.