Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता बऱ्यापैकी ओसरला आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने उघडीप दिली आहे. खरे तर सप्टेंबरची सुरुवात ही जोरदार पावसाने झाली होती.
एक, दोन आणि तीन सप्टेंबरला राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला होता. तदनंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. गणरायाच्या आगमनापर्यंत पावसाची विश्रांती होती.
मात्र गणरायाच्या आगमनाच्या दिवशी अर्थात सात सप्टेंबरला राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला. सात तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
मात्र जशी एक ते तीन सप्टेंबर दरम्यान पावसाची तीव्रता होती तशी तीव्रता या काळात पाहायला मिळाली नाही. दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा निवळला आणि पावसाचा जोरही कमी झाला.
अशातच आता भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ला निना सक्रिय झाला असून यंदा सप्टेंबर महिन्यात चांगला जोरदार पाऊस होणार असा अंदाज आहे.
काही तज्ञांनी तर पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तथापि गेल्या दोन-तीन दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. कुठेचं जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला नाही.
पाऊस गायब झाला असल्याने उकाडा वाढत चालला आहे. दरम्यान आगामी दोन दिवस म्हणजे आज आणि उद्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असल्याने राज्यातील उकाडा पुन्हा कमी होणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव अन मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिह्यांमधील घाट परिसरातही पावसाचा जोर राहू शकतो.
तसेच राज्याच्या पठारी भागात मध्यम सरींचा अंदाज देण्यात आला आहे. मराठवाड्याबाबत बोलायचं झालं तर येथील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली येथे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.