Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. काल-परवा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा समवेत अनेक भागांमध्ये मध्यम ते जोराचा पाऊस पडला आहे.
12 जून ते 20 जून दरम्यान मोसमी पावसाचा खंड पडल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे आगामी काही दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसणार आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, अरबी समुद्रावरून येणारे मान्सूनचे प्रवाह बळकट होऊ लागले आहेत. याचा परिणाम म्हणून किनाऱ्यावर बाष्प जमा होत आहेत.
हेच कारण आहे की, आगामी काही दिवस कोकण किनारपट्टीवर आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. आज निम्म्या महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे.
म्हणजे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. गेल्या 24 तासात राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला आहे.
आजही राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आणि काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण विभागातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. याशिवाय पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील या तिन्ही जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आयएमडीने दिला आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील या संबंधित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट
आज मुंबई सह उत्तर कोकणातील पालघर आणि ठाणे, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, धुळे, तसेचं विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.