Maharashtra Rain : गेल्या महिन्यात महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट पाहायला मिळाले. गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे या चालू मे महिन्यात देखील वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चिंता वाढत आहे. खरंतर या चालू महिन्याच्या सुरुवातीला गेल्या महिन्यात सुरू झालेले वादळी पावसाचे सावट थांबले आणि तेव्हापासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
राज्यातील काही भागांमध्ये तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले. उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. याशिवाय, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात देखील विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे.
अशातच मात्र राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग तयार झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा आणि आसपासच्या परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाल्याचे पाहायला मिळतं आहे.
तसेच मराठवाड्यापासून ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये प्रचंड उकाडा जाणवण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी वादळी पाऊस बरसणार असा अंदाज देण्यात आला आहे.
उकाड्यामुळे नागरिक आधीच हैराण आहेत आता पुन्हा एकदा उकाडा वाढणार असा अंदाज असल्याने नागरिकांची चिंता वाढत आहे. दुसरीकडे वादळी पाऊस बरसणार असा अंदाज देण्यात आला असल्याने शेतकरी बांधवांची देखील चिंता वाढत आहे.
हवामान खात्याने आज राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा दिला असून या पार्श्वभूमीवर सदर जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. आज मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्याची शक्यता आहे.
तसेच वादळी पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे. लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये आज पूर्वमोसमी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
तसेच राज्यातील बाकीच्या भागात आज उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष बाब म्हणजे विदर्भातील अकोल्यात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
यामुळे अकोला जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करावे लागणार आहे. खूपच गरजेचे असेल तेव्हाच घराबाहेर पडावे अन्यथा घरातच राहावे असा सल्ला तज्ञ लोकांनी यावेळी दिला आहे.