Maharashtra Rain : आज संपूर्ण देशभरात हिंदू धर्माचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामांच्या जयंती दिनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. रामनवमी सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. खरेतर आजची रामनवमी ही संपूर्ण सनातन धर्मातील लोकांसाठी अधिक खास ठरणार आहे.
कारण की पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीक्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिरात आगमन झालेले आहे. दरम्यान आजच्या या पावन महूर्तावर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 17 एप्रिल 2024 ला राज्यातील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे.
मध्यंतरी वादळी पावसाचे हे सत्र थांबणार असे चित्र तयार झाले होते, मात्र हवामानात झालेल्या बदलांमुळे आता हे सत्र आणखी काही दिवस सुरू राहणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.
आगामी काही दिवस महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग असेच कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला निश्चितच दिलासा मिळणार आहे. पण, राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा तापमान 40°c ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे.
यामुळे उन्हाचा चटका सहन करावा लागतोय. मध्यंतरी विदर्भासहित राज्यातील विविध भागातील तापमान कमी झाले होते. पण आता पुन्हा एकदा उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि उकाडा कायम आहे.
IMD ने सांगितल्याप्रमाणे, विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि वादळी पावसाची शक्यता आहे.
काल मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान तयार झाले होते. या भागात अगदी पावसाळी वातावरण पाहायला मिळत होते. येथील उन्हाचा चटका या ढगाळ हवामानामुळे काहीसा कमी झाला मात्र उकाडा कायम होता.
दरम्यान आज म्हणजेच 17 एप्रिलला राज्यातील अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे. वादळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन जाणकार लोकांनी यावेळी केले आहे.