Maharashtra Rain : महाराष्ट्रात सध्या ऊन, पावसाचा खेळ सुरू आहे. गेल्या सात ते आठ दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये वादळी पाऊस होत आहे तर काही ठिकाणी उन्हाचा चटका आणि उकाडा प्रचंड वाढला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये उष्णतेची लाट येत आहे. वाढत्या उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.
प्रत्येकालाच हा वाढता उकाडा नको-नकोसा झालाय. राज्यात वादळी पाऊस सुरू आहे मात्र वादळी पावसामुळे देखील उकाडा कमी होत नाहीये. या उलट तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मध्यंतरी 40°c पर्यंत खाली आलेले तापमान आता पुन्हा एकदा 43°c पोहोचले आहे.
राज्यातील बहुतांशी भागात तापमान 40°c च्या पुढे नमूद केले जात आहे. एकंदरीत राज्यात सध्या संमिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. अशातच, मात्र हवामान खात्याने आज पुन्हा एकदा राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येणार आणि काही भागांमध्ये वादळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज जाहीर केला आहे.
कुठं बरसणार पाऊस
काल राज्याच्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ विभागात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस अन काही ठिकाणी हलकी गारपिट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या शेती पिकांना वादळी पावसाचा आणि गारपिटीचा तडाका बसला आहे. यामुळे पीक उत्पादनात मोठी घट येणार अशी भीती व्यक्त होत आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण विदर्भापासून मराठवाडा ते दक्षिण कर्नाटक पर्यंत सक्रिय असणारा हवेचा कमी दाबाचा पट्टा आता निवळला आहे. पण, असे असले तरी आजही राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक मराठवाड्यातील नांदेड अन विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या भागात वादळी पाऊस होणार अशी शक्यता आहे.
दुसरीकडे राजधानी मुंबईसह उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण भागात उष्णतेची लाट येणार असे म्हटले जात आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असा इशारा भारतीय हवामान खात्याने जारी केला आहे.
मान्सून मात्र समाधानकारक
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सत्र जरूर सुरू आहे मात्र शेतकऱ्यांसाठी नुकतीच आनंदाची बातमी देखील समोर आली आहे. ती म्हणजे यंदा मान्सून काळात खूपच चांगले पाऊसमान राहणार आहे. जून ते सप्टेंबर 2024 या चार महिन्यांच्या पावसाळ्याच्या काळात सरासरीपेक्षा जास्तीचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यंदा मान्सून वेळेवर किंवा वेळेआधीच दाखल होऊ शकतो असे देखील हवामान तज्ञ नमूद करत आहे. ला निना अन इंडियन ओशियन डायपोल हे सकारात्मक राहणार अन देशात चांगला पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.