Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती तयार झाली आहे. यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांना देखील मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे.
गेल्या काही तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये अगदी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे पावसाची ही तीव्रता आजही कायम राहणार असा अंदाज आहे.
हवामान खात्याने आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून या पार्श्वभूमीवर सदर जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आय एम डी ने अर्थातच भारतीय हवामान खात्याने आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आज दक्षिण कोकणातील रायगड, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आयएमडीने वर्तवला असून या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांसाठी हवामान खात्याच्या माध्यमातून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यातील सातारा जिल्ह्यातील घाटमाथा परिसरावर अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, जिल्ह्याच्या उर्वरित भागात मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. दरम्यान आज पुणे जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील घाटमाथा परिसरावर अति मुसळधार पावसाची शक्यता आहे जिल्ह्याच्या उर्वरित भागांमध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असे आयएमडीने यावेळी स्पष्ट केले आहे. कोकणातील ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यासाठी देखील आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज राजधानी मुंबईत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज देण्यात आला आहे. शिवाय आज मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असून या भागासाठी आज रेड अलर्ट जारी झाला आहे.
दरम्यान, कोकणात आणि घाटमाथा परिसरावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार ते अति मुसळधार पावसामुळे तिथे दरड कोसळण्याची भीती अधिक जाणवत आहे.
यामुळे या संबंधित भागातील दरड प्रवण क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या स्थानिकांनी आगामी काही तास काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी जाणकारांनी केले आहे.