Maharashtra Rain : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी लागली होती.
विशेष म्हणजे काही ठिकाणी गारपीट देखील झाली. यानंतर नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली. जानेवारीच्या सुरुवातीला राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला तर काही ठिकाणी ढगाळ हवामान कायम होते.
यामुळे आता फेब्रुवारीचा महिना कसा जाणार हा मोठा सवाल आहे. फेब्रुवारी महिन्यातही अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार का, तापमान कसे राहणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान याच संदर्भात जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. खुळे यांनी म्हटल्याप्रमाणे यंदा फेब्रुवारी महिन्यात पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे.
याचा परिणाम म्हणून थंडी कमी होणार आहे. या चालू आठवड्यात राज्यात काही प्रमाणात थंडीची जाणीव होईल मात्र दुसऱ्या आठवड्यापासून थंडीचा जोर कमी होणार आहे.
या फेब्रुवारी महिन्यात कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र कमाल तापमान हे सरासरी एवढेच राहील.
त्यामुळे या महिन्यात थंडीची लाट येण्याची शक्यता जवळपास नगण्य आहे. विशेष म्हणजे खुळे यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाचा अंदाज दिला आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली आणि सोलापूर हे 6 जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस बरसणार असा अंदाज खुळे यांनी दिला आहे. अर्थातच महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांमध्ये या महिन्यात सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता आहे.
तसेच परभणी, नांदेड, हिंगोली, वासिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये पावसाची सर्वाधिक शक्यता आहे. या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे कोकणात मात्र सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होणार नसून तिथे पावसाचे प्रमाण या महिन्यात कमी राहणार आहे. यामुळे आता ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांचा हा हवामान अंदाज खरा ठरतो का याकडे विशेष लक्ष राहणार आहे.