Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हवामान खात्याने आज राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप राहणार असे म्हटले असून उर्वरित नऊ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली.
तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. मात्र बहुतांशी भागात पावसाची रीपरीप पाहायला मिळाली. काल दुपारनंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान झाल्याचे पाहायला मिळाले होते.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आजपासून अर्थातच 9 ऑगस्ट 2024 पासून पाऊस काही काळ विश्रांती घेणार असल्याचा अंदाज जारी केला आहे.
काय म्हटले हवामान खात्याने
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अगदीच बोटावर मोजण्याइतक्या जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
उर्वरित राज्यात अर्थातच संपूर्ण खान्देश, मराठवाडा अन मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस विश्रांती घेणार असल्याचे म्हटले आहे. आज दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि रायगड मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात देखील घाटमाथ्यावर आज पावसाचा जोर अधिक पाहायला मिळणार आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे.
यासोबतच आज विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती या पाच जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या संबंधित नऊ जिल्ह्यांना आज जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र हे जिल्हे वगळले तर संपूर्ण महाराष्ट्रात आज पावसाची विश्रांती राहणार आहे. एकंदरीत, आज पाऊस सुट्टीवर राहणार आहे.
यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीमधील कामांना वेग दिला पाहिजे असा सल्ला देण्यात आला आहे. फवारणीसारखी कामे या कालावधीत पूर्ण करून घ्यावीत असे मत कृषी तज्ञांनी व्यक्त केले आहे.