Maharashtra Rain : गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद करण्यात आली आहे. ऐन दिवाळीत राज्यातील काही भागांमध्ये पावसाने दणका दिला आहे. काही ठिकाणी ढगफुटी सारख्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पुन्हा एकदा नुकसान झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे आज दीपोत्सवाच्या शेवटच्या दिवशी अर्थातच भाऊबीजेला देखील महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज समोर आलाय.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज भाऊबीजेच्या दिवशी महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या सदरील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.
राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असून त्या भागात थंडीची तीव्रता हळूहळू वाढत जाणार आहे. एकंदरीत आज महाराष्ट्रात संमिश्र हवामान पाहायला मिळणार आहे.
काही ठिकाणी गारठा जाणवणार आहे तर काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान खात्याने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये सांगितल्याप्रमाणे, मुंबई, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात आज हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
पण रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड येथील १२ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित किरकोळ पावसाची शक्यता आहे. राज्यातील उर्वरित २४ जिल्ह्यात केवळ स्वच्छ वातावरण जाणवेल,
हवामान प्रामुख्याने कोरडे राहील असे हवामान विभागाने सांगितलय. दरम्यान नोव्हेंबर महिना सुरू झाल्यानंतरही ऑक्टोबर हिटची प्रचिती येत आहे. ज्यामुळे ऑक्टोबर हिटपासून दिलासा कधी मिळणार, तापमानात कधीपासून घट होणार आणि थंडीला कधी सुरुवात होणार हा मोठा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने पावसाचे वातावरण निवळल्यानंतर महाराष्ट्र थंडीची चाहूल लागणार असे सांगितले आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात काही प्रमाणात थंडीची चाहूल लागली आहे. तेथील वातावरणात गारवा तयार होत आहे.
उत्तर महाराष्ट्र अन कोकणातील कमाल तापमानातही घट झाली आहे. आता उद्यापासून पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. म्हणून 5 नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रात थंडीची तीव्रता आणखी वाढणार आहे. नोव्हेंबर महिन्यात थंडी कमीच असेल, पण डिसेंबर आणि जानेवारी मध्ये थंडीचे प्रमाण अधिक राहणार आहे.