Maharashtra Rain : महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून याचा प्रभाव म्हणून राज्याच्या किमान तापमानात वाढ होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे, तर काही भागांमध्ये थंडीचा जोर कायम आहे. पण ढगाळ हवामानामुळे आणि तापमान वाढीमुळे राज्याच्या काही भागांमध्ये भारतीय हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमान हे दहा अंश सेल्सिअस पेक्षा अधिक नोंदवले जात असून याचा प्रभाव म्हणून ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
डिसेंबर महिन्यातही राज्यात अवकाळी पाऊस झाला होता आणि आता जानेवारी महिन्यातही राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आणि आता पुन्हा तीच परिस्थिती पाहायला मिळू शकते असे भारतीय हवामान विभागाच्या नव्या अंदाजावरून स्पष्ट होत आहेत.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे राज्याच्या किमान तापमानात गेल्या दोन दिवसात वाढ झाली असून येत्या दोन दिवसात राज्यातील किमान तापमानात आणखी दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात नैऋत्य दिशेला चक्राकार वारे सक्रिय झालंय अन राजस्थान व आजूबाजूच्या भागापासून अरबी समुद्रात कमी दाबाचा एक पट्टा तयार होतोय. याचा परिणाम असा झालाय की, उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमानात चढउतार होत आहे.
तसेच, हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणामध्ये प्रचंड गारठा वाढलाय अन आपल्या राज्यातील गारठा थोडासा कमी झाला असून काही ठिकाणी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
राज्यात येत्या दोन दिवसात पावसाला पोषक हवामान तयार होणार असून विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे.
राज्यातील उत्तर कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मात्र महाराष्ट्रात सध्या पावसासाठी पोषक परिस्थिती नाहीये, असा अंदाज दिला आहे.
सध्या राज्यात फक्त ढगाळ हवामान राहणार कुठेच पाऊस पडणार नाही असे पंजाब रावांचे म्हणणे असून त्यांनी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो असे यावेळेस स्पष्ट केले आहे.