Maharashtra Rain : राज्यात गेल्या काही दिवसांपासून संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात कडक ऊन पडत आहे. एवढेच नाही तर मध्यंतरी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये वादळी पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दुसरीकडे उष्णता प्रचंड वाढली असल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये उष्ण रात्री अनुभवायला मिळत असून यामुळे सर्वसामान्य नागरिक खूपच हैराण झाले आहेत. अशातच आता हवामान विभागाने आणखी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे.
राज्यातील काही भागांमध्ये तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे मात्र हवामान खात्याने अजूनही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज जारी केला आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील काही भागात पाऊस तर बहुतांशी ठिकाणी उन्हाची तीव्रता वाढणार असा अंदाज जारी केला आहे.
आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये उद्याही उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज आयएमडीने यावेळी जारी केला आहे.
परिणामी राजधानी मुंबईसह कोकणातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने आज मराठवाडा आणि विदर्भातील 14 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज मराठवाडा विभागातील बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या 5 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच, या भागात उष्ण रात्री सुद्धा अनुभवायला मिळू शकतात.
म्हणजेच रात्रीच्या वेळी प्रचंड उकाडा जाणवू शकतो असा अंदाज देण्यात आला आहे. याशिवाय हवामान खात्याने आज विदर्भ विभागातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या 9 जिल्ह्यांमध्ये देखील वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या पार्श्वभूमीवर मराठवाडा आणि विदर्भ विभागातील सदर 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
तसेच मुंबई सह कोकणातील नागरिकांना उष्णतेची लाट येण्याची शक्यता लक्षात घेता वाढत्या उकाड्यापासून आणि उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करावे लागणार आहे.
उष्णता प्रचंड वाढली असल्याने उष्माघात होऊ शकतो. यामुळे खूपच आवश्यकता असेल तेव्हाच घराबाहेर निघावे अन्यथा घरातच थांबावे असे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे.