Maharashtra Rain : गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यात, मध्य महाराष्ट्रात, कोकणात आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी सारख्या पावसाची परिस्थिती अधिक पाहायला मिळाली. खरे तर जून मध्ये चांगला जोरदार पाऊस झाला नाही, जुलै च्या पहिल्या आठवड्यात सुद्धा महाराष्ट्रात कुठेच जोराचा पाऊस पाहायला मिळाला नाही.
यामुळे राज्यातील शेतकरी मोठे चिंतेत होते. पण गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली असेल आणि आता कुठे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.
अशातच, आता हवामान खात्याने पुढील 24 तासात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे, उद्यापासून अर्थातच 12 जुलैपासून राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.
उद्यापासून कोकण आणि घाटमाथ्यावर आता जसा पाऊस सुरू आहे त्यापेक्षा अधिक जोराचा पाऊस बरसणार असा अंदाज आयएमडी कडून समोर आला आहे.
गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील कोकण आणि घाटमाथा विभागावर तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला.
आज देखील राज्यातील कोकण, विदर्भ आणि घाटमाथा परिसरावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून मात्र पावसाचा जोर वाढणार आहे.
हवामान खात्याने आपल्या अंदाजात म्हटल्याप्रमाणे, आज राजधानी मुंबईसह उत्तर कोकणातील ठाणे, दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्राच्या नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
तसेच विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागांसाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पण, उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज आहे.