Maharashtra Rain : राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, गुजरातमध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून हा कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होतं चालला आहे. यामुळे महाराष्ट्रातील वातावरणातील बाष्प खेचले गेले आहे. म्हणून गेल्या काही दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतला आहे.
पण लवकरच पावसाचा विश्रांतीचा काळ संपणार आहे. कारण की, आता राज्यात पावसाचा जोर वाढणार असे आय एम डी चे म्हणणे आहे. आय एम डी च्या म्हणण्यानुसार, उद्यापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल.
भारतीय हवामान खात्याने उद्यापासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचे म्हटले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच, शनिवारी विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
या अनुषंगाने या संबंधित जिल्ह्यांना शनिवारसाठी येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ठिक-ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी पावासचा जोर वाढणार आहे. रविवारी आणि सोमवारी देखील राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अर्थातच बैलपोळ्याला देखील महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. खरंतर दरवर्षी बैलपोळ्याच्या दिवशी राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळते. यंदाही बैलपोळ्याच्या दिवशी राज्यात पावसाची शक्यता आहे.
ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील राज्यात एक सप्टेंबर ते 6 सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत राज्याच्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागात जोरदार पाऊस पडणार असा अंदाज देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात म्हणजेच पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात या कालावधीत पावसाचा जोर काहीसा कमी राहण्याची शक्यता आहे. कोकणाबाबत बोलायचं झालं तर मुंबई आणि कोकणात या कालावधीत आता जसा पाऊस सुरू आहे तसा सुरूच राहणार आहे.